अट्टाहास
११५ बुधवार पेठ, देव वाडा.
खिडकीच्या दारावर ह. दा . घाटे अशी पाटी लिहिलेली ..
त्या खिडकीला जवळ जवळ गेली ६५ –७० वर्ष बंद असायची सवय नव्हती . खिडकीच्या मागे असलेल्या घराला कधी एकटेपणा हे काय असतं ह्याची कल्पना नव्हती . हे घर अगणिक लोकांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे.साधारण १९५२ च्या सुमारास रामचंद्र गोविंद अंबिके ह्यांची थोरली मुलगी मालती अंबिके (माझी आजी) हरीभाऊ घाटे (माझे आजोबा) ह्यांची पत्नी बनून ह्या घरात आली आणि त्याबरोबरच ह्या ३ खोल्यांच्या प्रशस्त घराचा अनेक लोकांशी ऋणानुबंध जडला . मालती उर्फ नलिनीच्या माहेरचा गोतावळा मोठा , सासरचा ही फार काही लहान नाही . घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आपुलकीने विचारपूस केली जायची– अगदी घरातील प्रत्येकाकडून..मग त्या माई आज्जी असू दे केंव्हा भाऊ काका केंव्हा नाना काका असू दे. माहेर सासर असं फारसा भेदभाव ना करता प्रत्येकाचं यथोचित आदरातिथ्य केलं जायचं..कोणी शिक्षणानिमित्त ,कोणी कामानिमित्त , पार लग्नाची बोलणी करण्यानिमित्त असा अनेक जणांचा राबता ..घराचे फारच लाड व्हायचे ..घरातली वास्तू देवता प्रसन्न असणार – सतत चेहऱ्यावर हसू राखून सगळ्यांचा मनमोकळेपणे स्वागत करणारी गृहलक्ष्मी असल्यावर वास्तू देवता ही खूशच असणार ..
जसा काळ सरू लागला , तशी घरातली माणसं कमी होऊ लागली ..कोणी लग्न होऊन बाहेर पडलं, कोणी नवीन घर घेऊन संसार थाटला. परिवार जरी मोठा होत गेला असला तरी घरात इन मीन दोनच माणसं राहिली आणि त्यांच्या आयुष्यातील सहजीवनाचा एक वेगळाच टप्पा सुरु झाला. एका जखमेचं निमित्त पुरून आजोबांचा एक पाय diabetes मुळे निकामी झाला..लवकरच दुसरा ही गेला..पण ना त्यांनी धीर सोडला , ना इतरांनी (बायको, मुली , जावई, नात्यातील इतर मंडळी ) त्यांना धीर सोडू दिला. आजीआजोबांच्या आयुष्यातील ह्या टप्प्यापर्यंतचा सहप्रवास मला फक्त ऐकीवातून माहित आहे. पण ह्या नंतरच्या गोष्टी माझा आठवणीतील आहेत .
जेव्हापासून माझा आठवणीत गोष्टी आहेत, तेव्हापासून आजीआजोबा कधी वैतागले आहेत , चिडचिड करत आहेत हे मला आठवतच नाही. आजोबा नेहमी त्यांच्या दिवाणखान्यातील कॉटवर असत.. बिचारे आजोबा असं म्हणायचं माझं धाडस नाही .. कारण ते बिचारे आहेत असं त्यांना स्वतःला कधी वाटलं नसावं आणि त्यामुळे त्यांना कधी कोणी सहानुभूती देत आहे असं माझ्या आठवणीत नाही . कॉट वरून त्यांना दिसणाऱ्या दुनियेत ते रममाण असायचे . कारण खिडकीतून येणारे जाणारे दिसायचे..संध्याकाळी त्यांना उठवून बसवलं की चार गप्पा होत असत… सतत कॉट वर पडून आहेत म्हणून कधी कोणावर चिडचिड केली नाही ना कधी आजीवर कधी कुठल्याही प्रकारची यायची जायची बंधनं घातली. उलट तिला सतत प्रोत्साहन देत असत की तिनी बाहेर पडावं , कुठे बाहेर जावं आणि तिला थोडा बदल मिळावा. ते कुठे जाऊ शकत नाहीत म्हणून तिनी काही करू नाही अशी वृत्ती मुळीच नाही . मुलींना ही त्यांची खूप ओढ असल्यानी त्या ही वरचेवर येऊन आजी ला थोडा आराम देत . ते गेले तेंव्हा आजीच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला – वेळेचं करायचं काय . ज्या माणसाचा इतका सहवास होता , आधार होता तोच नाहीसा झाल्यावर जी पोकळी निर्माण होते ती भरून कशी काढायची . पण तिनी स्वतःला इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून घेतलं की कोणाला वाटणारसुद्धा नाही की ह्यांना एकटेपणा कधी खात असेल . भजनीमंडळ , मुली , नातवंड , जावई आणि इतर नातलग ह्यात वेळ छान घालवायला लागली . नातवंड जशी मोठी होऊ लागली तसं ती त्यांची आजी कमी आणि मैत्रीण जास्त बनून गेली . अतिशय प्रगतीशील विचार , सतत प्रोत्साहन त्यामुळे काही वेळा असं सुद्धा झालं की आई बाबांच्या आधी तिला जाऊन गोष्टी सांगितल्या गेल्या – केवळ एका मैत्रिणीच्या नात्यानी .. इतपत की आम्हा नातवंडांच्या मित्र मैत्रिणींना हेवा वाटायचा की तुमची आजी कसली cool आणि awesome आहे आणि म्हणूनच ते सुद्धा आजी कडे हक्कानी आमटी भात खायला येऊन जायचे .
आमचं म्हणजे नातवंडाचं म्हणाल तर आमचं बालपण आणि आजोळ म्हणजे एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो . अंगणात झोपणे , मच्छरदाणी लावून आतमध्ये यथेच्च दंगा करणे , पेशवे पार्क , भेळ आणि मस्तानी, झारा आणि उलत्न घेऊन युद्ध युद्ध खेळणे , शनिवारवाड्यावर २ रुपये भाडं देऊन cycle भाड्यानी घेऊन शिकणे , गणपतीची मिरवणूक , तिच्या छोट्या देवघरात ती पूजा करायला बसली की जाऊन मध्ये मध्ये लुडबुड करणे– आमचे प्रताप नं संपणारे होते आणि तिचा patience सुद्धा. आजी असणं हे तिनी पूर्णपणे उपभोगलं आणि त्याची मजा लुटली . माझ्या दृष्टीकोनातून जर बघायला गेलं तर मी घरातून २१ व्या वर्षी बाहेर पडले. आधी ते स्वातंत्र्य हवंहवंसं वाटायचं ..जशी थोडी मोठी झाले, जर्मनी मध्ये येऊन राहिले तसं कळायला लागला की एकटेपणा काय असतो . त्यात आजारपण आलं . बराच काही शिकवून गेलं. आधीच घट्ट असलेली नाती अजून घट्ट करून गेला . वास्तविक पाहता आजीचं वय लक्षात घेता आम्ही तिचा आधार बनायला हवं – पण उलटंच घडत होतं . सगळ्यांना सतत मानसिक आधार दिला . १९ वर्षाच्या नातवापासून ५० च्या पुढच्या जावयाला . आधाराची इतकी सवय झाली की एकटेपणा फार त्रास देऊ लागला की तिला फोन करून ५ मिनिटं बोललं तरी मस्त वाटून लगेच काम करायला लागायचं असा शिरस्ता पडून गेला .. तिचा आणि माझा एक एक माणसाचा स्वयंपाक .. काय करावं असं विचारलं असता Maggi केंव्हा Pasta करून खा .. लवकर होईल आणि पोट भरेल अशी उत्तरं जेंव्हा मिळू लागली तेंव्हा मजा वाटू लागली .. भजनी मंडळातील बायकांना जेंव्हा तिनी सांगितलं कीती Skype वर नातीशी Video chat करते तेंव्हा तिच्या मैत्रिणी गार पडल्या असणार . परदेशी नातजावई चालेल मला .. त्यानी माझ्याशी फक्त गप्पा माराव्यात .. मग अगदी इंग्लिश सुद्धा चालेल असं सांगणारी आमची ही मैत्रीण . कोण म्हणेल ही आजी आहे .. ओळखी पालखीच्या सगळ्यांना चारही नातवंड काय करतात , कुठे असतात ह्याबद्दल सविस्तर माहिती देणारी आजी ; आम्ही म्हणू तेंव्हा म्हणू ते खायला करून देणारी आजी , नवीन गोधड्या करता याव्यात म्हणून चावट नातवंड नवीन साड्या घायला लावतात हे माहित असून सुद्धा त्याची मजा घेणारी आजी एका शब्दानी सुद्धा नं सांगता शांतपणे निघून गेली . घरातून निघताना जाते म्हणू नाही , येते म्हणावं असं शिकवणारी आजी निरोप सुद्धा नं घेता निघून गेली आणि मनाला एक रुखरुख लावून गेली .
त्या घरात वावरताना अजूनही कुठेतरी भास होत राहतात की अचानक येईल का समोर आणि म्हणेल का “आमटी भात खाशील नं ? कूकर लावते पटकन.” केंव्हा ” तुला नारळाची वडी आवडते नं.देऊ का? करून ठेवलीये मी ..वाटलंच होतं ह्या एक दोन दिवसात होईल तुझी चक्कर म्हणून आपली केली “.. अर्धवट झोपेत ती भिंतीला टेकून बसलीये आणि जप करतीये असाही भास झाल्याशिवाय राहत नाही . सकाळी ६ वाजता आकाशवाणी वरचे कार्यक्रम जेंव्हा लागत नाहीत तेंव्हा चुकल्याचुकल्या सारखं वाटतं ..मस्करी करायला, लाड करायला आणि करून घ्यायला आवडणारी आमची Young at Heart मैत्रीण आता फक्त Heart मध्ये एका कोपऱ्यात , नेहमीच्या सवयीप्रमाणे डोळे बंद करून एका हातात जप माळ घेऊन, दुसऱ्या सायीसारख्या सुरकुतलेल्या हातानी पायावर हात फि