कालाय तस्मै नमः
ह्या वर्षी महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणून लेखल्या जाणाऱ्या पु ल देशपांडे – आपल्या सगळ्यांच्या आवडीचे पु ल – ह्यांचा जन्मशताब्दी सोहळा. त्यानिमित्ताने फक्त देशभरातच नाही तर जगभरातही विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
त्या निमित्तानी मध्यंतरी Switzerland मधील Zürich ह्या शहरात पुलोत्सव अनुभवायचा योग आला. पु ल हे मला अतिशय प्रिय – कोणत्याही अवघड, क्वचित दुःखाच्या प्रसंगी सुद्धा त्यांचा सखाराम गटणे, नंदा प्रधान अथवा रावसाहेब केंव्हा पेस्तन काका भेटले की मन कसं एकदम हलकं होतं. सुंदर मुलगी दिसली की हरितात्या, यमी आणि भवानी मातेनी तिचा केलेला मेकअप आठवतो केंव्हा क्वचितप्रसंगी मुंबई पुणे ह्या शहरांना बदलताना बघितले की धोंडोपंत आणि कुटुंबीय आठवतात. आणि इतकं असूनही शहरं जरी बदलत असली तरी पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकरांचे गुण पुलंच्या लिखाणामुळे अजूनही ओळखू येतील हे जेंव्हा जाणवतं तेंव्हा मनोमनी पु लं च्या समोर नतमस्तक व्हायला होते.
जर्मनी ला येऊन खरं म्हणजे मला ९ वर्ष झाली, पण तरी ही माझं मराठीपण काही कमी झालं नाही, असं मी म्हणेन. आणि त्याचं काहीसं श्रेय माझं पु ल देशपांडे , व पु काळे, वि स खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत आणि अजून इतर काही लेखकांशी, त्यांच्या पुस्तकांशी असलेल्या नात्याला जाते.
एका अमेरिका दौऱ्यात पु लं ना कोणीतरी विचारलं होतं – “मराठी संस्कृती जपून ठेवण्यासाठी आम्ही काय करावं?” त्यावर त्यांचं अतिशय चपखल असं उत्तर होतं – “आता माझ्याकडे काय औषध आहे का पुड्या आहेत? की हे घ्या. रोज प्रत्येक मराठी माणसानी ४ गोळ्या खाव्यात म्हणजे मराठी संस्कृती टिकेल.
संस्कृती टिकवायची म्हणजे काय deep freezer मध्ये घालून टिकवता येते का? संस्कृती ही सतत व्यवहाराबरोबर बदलणारी गोष्ट आहे.”
ह्या उत्तरात जरी त्यांनी हे प्रश्न विचारणाऱ्यांची मिश्कीलपणे टर उडवली असली, तरी त्या उत्तरामध्ये एक अतिशय प्रगतिशील, पुरोगामी विचार दडलेला आहे.
पु लं ची जरी मी भक्त असले तरी बऱ्याचदा इथे घडत असलेल्या अश्या ‘सांस्कृतिक’ कार्यक्रमांपासून काही वेळा दूर राहते – म्हणजे खरं तर दूर रहायला लागले. ह्या मागचे एक कारण म्हणजे काही वेळा अश्या कार्यक्रमांना येणारे श्रोते हे खरंच संस्कृती Deep Freezer मध्ये ठेऊन भारतामधून ती इकडे घेऊन आले आहेत असं वाटतं. इथे राहत असून सुद्धा त्यांची संस्कृती व्यवहाराबरोबर बदलत नाही. “आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट” ह्या तत्वानुसार त्यांचा व्यवहार चाललेला असतो. आपलं ते सगळंच चांगलं, इकडचे लोक मात्र संस्कृतिहीन, पैशासाठी वखवखलेले अशी ह्यांची धारणा. बऱ्याचदा पुरातन, बुरसटलेले विचार, त्यातून उद्भवणारे काही कलह हे त्यांचं कौटुंबिक जीवन अतिशय अवघड करून टाकतात. इतकंच नाही तर मुलांच्या बरोबरीने नवीन विचार, नवीन भाषा आपलीशी करण्यात त्यांना काहीच रस नसल्याने एका ठराविक वयानंतर त्यांचा मुलांबरोबर असलेला संवाद संपतो – राहतं ते फक्त नातं आणि त्याची चौकटी. आपलं चांगलं जे आहे ते जरूर जपावं, पण जे बदलायची काळानुरूप गरज आहे, ते बदलायला हवं हे deep freezer मधल्या ह्या लोकांच्या बहुदा लक्षातच येत नसावं. काही वेळा तर असंही बघण्यात आलं आहे, की तिकडे, मायदेशी गोष्टी वेगानी बदलत आहेत, ज्या गोष्टींकडे डोळसपणे बघायची गरज आहे ते बघितलं जात आहे, त्यावर चर्चा होत आहे. आणि मायदेशापासून लांब राहत असूनसुद्धा ‘संस्कृती’ जपायचा जणू काही मक्ताच ह्यांनी घेतलाय, असं जेंव्हा लोकं वागू लागतात, तेंव्हा मात्र थोडं वाईट वाटतं, थोडा राग येतो आणि थोडं अस्वस्थ ही व्हायला होतं.
पु ल म्हणजे असे एक व्यक्तिमत्व की जे बऱ्याच जणांसाठी मराठी माणसाच्या अस्मितेचा भाग आहे. त्यांना त्यांच्या मराठी असण्याचा अभिमान तर होताच. त्यांच्या आराध्य दैवतांपैकी काही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली थोर माणसं. पण त्यांच्याच बरोबरीने शेक्सपिअर, बेथोव्हेन, बाख ही सुद्धा त्यांची आदरस्थानं. एका पेक्षा दुसरा अव्वल हा भेदभाव मुळातच नसल्यामुळे नवीन माणसं, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता. जी लोकं मराठी असण्याचा गवगवा करतात, त्याच्या फुशारक्या मारतात, पु लं च मराठी असणं साजरं करतात, तीच माणसं पु लं ची पुरोगामी, प्रगतिशील विचारपद्धती का नाही आपलीशी करू शकत? ह्या अतिशय किचकट प्रश्नाचे उत्तर कोणालाही न दुखावता, अतिशय मार्मिक, मिश्किल पद्धतीने कदाचित पु लं च देऊ शकले असते.
पण एक मात्र नक्की – Zürich चा हा पुलोत्सव बघून मात्र पु लं चा ऊर नक्की भरून आला असता. Switzerland नावाच्या एका हजारो किलोमीटर दूर असलेल्या देशात, एका मराठी, भारतीय लेखकावर असलेल्या त्यांच्या प्रेमापोटी आजूबाजूच्या देशातील काही माणसे जमली, Netherlands नावाच्या दुसऱ्या देशातून कलाकार मंडळी त्यांचं नाटक सादर करायला जीवाची तगमग करत आली आणि काही तासांसाठी का होईना सगळ्या श्रोत्यांना जागेचा, वेळेचा, थंडीचा विसर पडला. Zürich मध्ये मला दीदीसाहेब राजे आणि कुटुंब भेटले आणि विचार करावयास भाग पाडून गेले. शिरपा आणि त्याचा चा चा चा, दमयंतीमाला, turin takiz भेटले, असा मी असामी मधला विठोबा विचारत होता “काय बडव्यांनी त्रास नाही ना दिला”. आणि जेंव्हा “पुंडलिक वर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम” हे घोषणा ऐकली तेंव्हा काही काळ काहीच सुचेनासे झाले. ह्या सगळ्या गोष्टींमधून पटकन एक उडती भेट देऊन आले पुण्याला – तेंव्हा पालखी दिसली, भक्तिमय वारकरी भेटले, आमची आजी दिसली. क्षणभर वाटलं की ती आत असलेली संस्कृती ना deep freezer मध्ये ठेवायची गरज आहे ना defrost करायची. ती नेहमीच ताजी टवटवीत राहणार आणि अश्या छोट्या छोट्या गोष्टींमधून नेहमी भेटत राहणार, जाणीव करून देणार – ह्या सांस्कृतिक वारस्याची, ह्या श्रीमंतीची. आणि हे सगळं सगळं फक्त पु लं मुळे आणि त्यांच्यासाठी, त्यांच्यावरच्या प्रेमासाठी खटाटोप करणाऱ्या गुणी कलाकारांमुळे.
जणू ह्या अनुभवाची नेहमी आठवण रहावी म्हणून असावं बहुतेक, पण एका Netherlands मध्ये राहणाऱ्या मराठी मैत्रिणीनी साकारलेल्या विठूमाऊलींना मी Switzerland हून माझ्या Germany मधल्या एका छोट्या खेड्यातल्या घरी घेऊन आले. घरात पाऊल टाकले तेंव्हा योगायोगानी “असा मी असामी” ऐकत होते आणि त्या क्षणी पु ल बदलत्या काळाबद्दल चिंतन करत होते आणि होणाऱ्या बदलांना आपलंसं करताना म्हणत होते: “जुन्या काय आणि नव्या काय. घड्याळांच्या तबकड्या आणि पट्टे बदलतात. सुखानी टळलेली दुपार पाहायला तबकडी आणि पट्टा कसला का असेना. घड्याळाचं काय आणि माणसाचं काय – आतला तोल सांभाळणारं चक्र नीट राहीलं की फार पुढेही जायची भीती नाही आणि फार मागे पडायची ही भीती नाही.”
P.S. पु ल चाहत्यांसाठी त्यांच्या अमेरिकेतील भाषणाची ही लिंक
https://www.youtube.com/watch?v=rsTwQTYGl8Q
(Written in November 2018)