सादळलेल्या आठवणी….
Whatsapp वरच्या फॅमिली ग्रुपवर येणारे message मी सहसा वाचत नाही – सध्याच्या निवडणुकीच्या धुमाकुळीत तर राजकीय पक्षांची आणि नेत्यांची बाजू घेणारे हे message वाचायचा वीट येतो.. पण आज जरा वेळ होता आणि अनेक दिवसांनी कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू नं घेणारा असा एक message दिसला. म्हणलं वाचूया. लहानपणीची अनेक बडबडगीते आणि ती ऐकल्यावर त्याबरोबर उचंबळून येणाऱ्या आठवणी आणि भावना असं काहीसं होतं त्या message मध्ये. ते सगळं वर्णन वाचलं आणि एकदम एका दुसऱ्या काळात, दुसऱ्या देशात, दुसऱ्या शहरात जाऊन पोचले. तो अनुभव लिहून काढणाऱ्या गृहस्थांना बडबडगीतं ऐकून आठवणी अनावर झाल्या, मला माझ्या जर्मनी मधल्या घरातून दिसणारा पाऊस, ती गार हवा आणि त्या नुकत्याच वाचलेल्या अनुभवातले लहानपण हे आठवून अनेक भावना, आठवणी अनावर झाल्या.
पाऊस हा आवडावा लागतो. पहिला पाऊस पडला की पुलंच्या भाषेत जे लोकं छत्री दुरुस्तीला टाकावी हा विचार करतात, त्यांना पावसाची मजा कधी अनुभवताच येणार नाही. पहिला पाऊस हा भिजण्यासाठी असतो, कागदाच्या होड्या करून त्या एका लहानश्या डबक्यात सोडून त्यांची शर्यत लावण्यासाठी असतो, खमंग कांदा भजी खाण्यासाठी असतो. पावसाळा म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर मात्र माझं आजोळ उभं राहतं. भर पुणे शहरात, मध्यवर्ती भागात एका बोळात आत शिरलं की एकदम एका दुसऱ्या जगात गेल्यासारखं वाटतं. नवीन इमारतींच्या गर्दीमध्ये अजूनही छातीठोक उभा असलेला तो दगडी वाडा. लाकडी कठडे, मातीच्या भिंती आणि शेणानी सारवलेली जमीन. पावसाळा सुरु झाला की पुढच्या अंगणात कोपऱ्यात छोटं डबकं तयार होत असे. जरा रिपरिप सुरु झाली की मग जुन्या वह्यांमधली पानं फाडून केंव्हां वर्तमानपत्राचे चौकोन कापून त्याच्या होड्या करून त्या डबक्यात सोडायच्या. त्या वेळी वाड्यात बरीच मुलं असायची. त्यामुळे त्या छोट्याश्या डबक्यात पाण्यापेक्षा होड्याच जास्त. त्यातली जरा मोठी आगाऊ मुलं लहान पोरांना उगाच ‘ते बघ, बेडूक बसलाय तिकडे’ अश्या काहीतरी गोष्टी सांगून घाबरवून सोडत. पावसाला जोर चढला की मग मात्र घरात जावं लागे. ढगांमुळे अंधारून आलेले असायचे. दगडी बांधकाम, मातीच्या भिंती आणि शेणानी सारवलेली जमीन ह्यामुळे घरात एक गारवा असायचा आणि त्याबरोबरच एक विशिष्ठ, हलकासा कुबट पण उबदार वास. लाकडी कपाटातून केंव्हा फडताळातून कोरडे कपडे काढून द्यायची मग आई केंव्हा आजी. त्यालाही एक विशिष्ठ उब. पंचानी खसाखसा डोकं पुसून द्यायची. स्वयंपाकघरात आजी कॉफी करून द्यायची (आमची मुलांची कॉफी म्हणजे काय आम्ही पांढरं दूध पित नाही म्हणून त्यात रंगासाठी चिमूटभर घातलेली कॉफी). आणि मग तिच्या पांढऱ्या झाकणाच्या हिरव्या बरणीमधून २ बिस्कीट मिळायची. ती सादळू नाहीत म्हणून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवलेली असायची. त्याबरोबरीने आजी बहुदा पोहे करायची तयारी करत असायची (पाऊस सरल्यावर आम्ही घरी जाणार असू तर) केंव्हा आमटी भाताचा कुकर लावायची (बऱ्याचदा तिथेच राहायचो आम्ही). पाऊस खूपच कोसळत असेल आणि गारवा फार वाढला असेल तर झोपताना मग एक हिरव्या रंगाची शाल, त्याला वरून एक सोलापुरी चादर आणि अगदी वाटलंच, तर पूर्वी असायचं तसं ते टोचरं ब्लॅंकेट असं सगळं जोडून एक जाड पांघरूण. काय गुडूप झोप लागायची.
मोठे झालो तसं असं राहायला जाणं कमी होत गेलं. रहायला गेलो क्वचित कधी तरी मग भिजणं, होड्या करणं कमी झालं. पण घराबाहेरच्या पायरीवर उभं राहून पाऊस बघायची, ऐकायची ओढ काही कमी झाली नाही. कधी तो वेडावाकडा बोचरा पाऊस कितीही सावरून उभं राहिलं तरी शेवटी ओलं करायचाच. पण त्या क्षणी तो बोचरा पाऊसही हवाहवासा वाटायचा. कारण आत जाऊन लगेच उबदार गोधडी मध्ये शिरता यायचं. आम्ही मोठे झालो तरी आजी ही आजीच राहिली. फार लाडात आलो तर मग तिच्या मांडीत डोकं ठेवून झोपायचं, मग ती तिच्या सायीसारख्या मऊ मऊ हातानी, डोळे बंद करून केसांमधून हात फिरवायची. आपोआप झोप यायची (तसं कोणी केलं तर अजूनही पहिले तिची आठवण येते आणि मग झोप येते). तो उबदार स्पर्श, तो ओलसर वास, हिरवी बरणी आणि तो कोसळणारा पाऊस – सगळ्या कश्या सादळलेल्या आठवणी. आज त्या भागात गेलं, की बोळात जायचा मोह आवरत नाही. पण बोळात शिरलं की पावलं आपसूक हळू पडू लागतात. ओट्यापाशी उभं राहिलं की मोडकळीला आलेला पण अजूनही छातीठोक उभा असलेला वाडा दिसतो. आज तिथे कोणाचं बिऱ्हाड नाही. त्याचं एकाकी अस्तित्व आणि जुनाटपण खटकतं, खूप काही सांगून जातं. आज आजी नाही आणि ते वाड्यातलं घरही नाही – ‘आमचं’ असं म्हणावं असं आजोळही नाही. तो वाडा अजून किती वर्ष तिथे उभा असेल ह्याची खात्री नाही. कदाचित पुढच्या खेपेला नसेल सुद्धा. पण अजूनही क्वचित कधी जर पावसाळ्यात तिथे जाणं झालं तर मात्र चित्रपटामध्ये जसं rewind करून बघता येतं तशी सगळी चित्रं डोळ्यासमोरून जाऊ लागतात – आई आणि मावशीची वार्षिक मॉन्सून सेलच्या खरेदीला जायची चर्चा, आमच्या पावसाळी बुटांची खरेदी, ते डबकं, ती बोचरी थंडी आणि ते उबदार घर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पायरीवरची आजी. आम्हाला निरोप द्यायला तिची पांढरी, लाल फुलं असणारी छत्री घेऊन निघालेली आजी. घरातून निघताना येते म्हणावं, जाते म्हणू नये असं शिकवणारी आजी. कोमेजलेल्या आणि रखरखलेल्या पानाफुलांना, झाडांना पाऊस जसं टवटवीत करतो, तसंच तो पाऊस ह्या सादळलेल्या आठवणी सुद्धा टवटवीत करतो आणि हलकेच डोळ्यांच्या कडा ओलावतात – तो, तिथे उभं राहून अनुभवलेला पाऊस चिंब ओलं करून सोडतो. मनावरचा आणि आठवणींवरचा ताबा सुटतो आणि राहून राहून एक गाणं आठवू लागतं ….
स्वर आले दुरुनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी
निर्जीव उसासे वाऱ्यांचे , आकाश फिकटल्या
ताऱ्यांचे कुजबुजही नव्हती वेलींची, हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी, स्वर आले दुरुनी.
विरहार्त मनाचे स्मित सरले, गालांवर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले, जखमेतुन क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी, स्वर आले दुरुनी.
पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केली कुणी, स्वर आले दुरुनी.