आवरा आवरी…

ते कधी कधी कसं होतं ना,
अचानक असं वाटायला लागतं आवरायला पाहिजे.

म्हणून मग एक एक करून काढल्या जातात Files ..
त्या File आवरता आवरता मधून च पडते एक चिठ्ठी..
“त्या” नं त्याच्या “ती” ला लिहिलेली…
आणि मग ती जाते हरवून त्या सोनेरी आठवणींमध्ये…
चिठ्ठी मध्ये फारसं विशेष काही लिहिलेलं नसतं..
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा एवढंच लिहिलेला असतं ..
पण त्या खाली “तुझा” लिहिलेलं असतं..
आणि त्याचं ते “फक्त तिचा च” असणं शहारून सोडतं तिला..

केंव्हा काही वेळा असतं एक सिनेमा चं ticket ..
तो ते टाकून देणार असतो पण ती म्हणते त्याला “दे माझ्याकडे..मी टाकीन”
आणि नंतर ते अवचित जपून ठेवते ती..
इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्याची ती एक आठवण तिला पुरेशी होते,
आणि त्याच्या आठवणीनी टचकन पाणी येते डोळ्यात तिच्या.
आणि मग तिचे तिलाच हसू येते..
आठवू लागतात दोघांनी एकत्र घालवलेले क्षण.. अगदी तारखेनिशी..
cooker ची शिट्टी वाजते आणि येते ती एकदम भानावर..

केंव्हा कधी कधी असं सुद्धा होता की “तो” बसतो शोधायला एखादा कागद..
आणि शोधता शोधता सापडते त्याला त्याचे पहिल्यांदा परदेशी गेला तेंव्हाचं विमान ticket आणि boarding pass  
आणि मग तो काम सोडून बाजूला विचार करत बसतो…
आणि अचानक आजी चा म्हातारा चेहरा तरळून जातो क्षणभरच डोळ्यासमोरून..
तिनी लाडानी करून दिलेली ती गोधडी, शोधून काढतो तो Blankets च्या गर्दी मधून..
आणि मग माजतं मनात आठवणींचं काहुर..
आठवतो आई चा लटका राग, घरी यायला उशीर झाला म्हणून..
आणि त्या बरोबरच आठवतो आई चा तृप्त चेहरा, जेंव्हा पहिल्या Scholarship मधून तो आई ला एक साडी घेऊन जातो..
बाबांचं सतत विचारणं “पैसे पुरतात ना रे तुला ??”, ऐकून राग यायचा तेंव्हा…
पण ज्या दिवशी त्यांना एक घड्याळ घेऊन गेला तो, त्या दिवशी हलक्याच पाणावल्या कडा त्या बाबा मधल्या “बापाच्या”..
त्यांना म्हणायचं असतं “आवडलं रे खूप घड्याळ..” पण शेवटी बाबाच ते..
त्यांच्या तोंडून निघून जातं..”कशाला रे उगाच खर्च माझ्यावर..साठवले असतेस ते पैसे. तुला बूट घेतले असतेस चांगले.. “

कधी एखादं पत्र, एखाद्या मित्रानी लिहिलेलं..
“लवकर बरी हो गं..मी वाट बघतो आहे इकडे..बरी हो आणि ये लवकर परत..”
जेंव्हा दोघांना माहित असतं, की लवकर येणं हे काही शक्य नाही..पण शेवटी मनच ते..
काहीतरी लालूच दाखवली की लागलीच हसू येतं त्याला आणि जोमानी बरं व्हायला सुरुवात होते.

कधी एखादं पत्र लिहिलेलं एका मैत्रिणीनी..”मी तुला खूप miss करीन..लवकर ये परत..तुला लवकर च भेटायची इच्छा आहे.”
कुठे असेल ती आज? काय करत असेल? आपल्या सारखीच ती ही गेली असेल संसारात गुरफटून..
घडी दोन घडीची काहीतरी भांडणं झाली..आणि आपण फुगून बसलो..
वाट बघत की ती येईल आपली समजूत काढायला..
पण काय माहित त्याला की त्याच्या रागानी ती इतकी घाबरून गेली की हिम्मतच नाही झाली तिची त्याला परत कधी काही सांगायची..
काय झालं असतं जर आपण परत बोललो असतो तिच्याशी??

Email चं असतं आजकाल ज्याला त्याला वेड.
Modern आणि Reliable का काय ते असतं असं म्हणतात..
पण एखादं जुनं पत्र, कागद पिवळसर झालेला, असं पत्र तासंतास हातात घेऊन बसायची मज्जा काय कळणार त्यांना..
एक file आवरायला म्हणून बसतो आपण,आणि एक एक करून इतके अगणिक कप्पे उघडले जातात आठवणींचे..
ते कप्पे आवरताना काय आनंद मिळतो तो शब्दांच्या पलीकडे असतो..
प्रत्येक सुंदर आणि वाईट आठवण, मोरपिसा सारखी अलगद काढून एकदा हाताळून परत ज्या त्या कप्प्यात ठेवून दिली जाते..
आणि त्यातच भर म्हणून बरसू लागतो बाहेर धो धो पाऊस..
आणि शेवटी मग मन काही साथ देईनासं होतं..
सुरु होतं मागे मिलिंद इंगळे चं गाणं “पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा..दारास भास आता हळुवार पावलांचा..”